लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन स्वकीयाकडून बदनामी षडयंत्र – कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही
तुळजापूर/ धाराशिव दिनांक २५ प्रतिनीधी
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये माझ्या उमेदवारीला मिळणारा लोकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन माझ्या विरोधात गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे . त्याला आपण थारा देणार नाही तसेच आपण काँग्रेस पक्षाची प्रदीर्घ काळ सेवा केली आहे त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार नाही, कोणत्याही भाजप नेत्याला आपण भेटलो नाही, जे लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी मला काँग्रेस पक्ष आणि निष्ठा शिकवू नये असा गर्भित इशारा राज्याचे माजी मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद माजी सभापती मुकुंद डोंगरे, प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, युवक नेते ऋषिकेश मगर, बाजार समितीचे संचालक एडवोकेट रामचंद्र ढवळे, काँग्रेसचे नेते रविराज कापसे, काँग्रेस नेते दिलीप सोमवंशी, होर्टी चे सरपंच संजय गुंजुटे, चिन्मय मगर, यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या नेत्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँगेस नेते वसंतदादा पाटील, शरदचंद्र पवार, सुधाकरराव नाईक, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या सहवासात आपले काँग्रेसचे राजकारण बहरले आहे. काँग्रेस पक्षाने जो जो आदेश दिला तो आपण जनतेच्या सेवेसाठी पाळला आहे त्याच्यामध्ये कोणतीही कुचराई केली नाही. सदैव जनतेच्या सेवेसाठी आपण काम करून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकट ठेवली आहे. आज माझ्या संदर्भात जे लोक गैरसमज पसरवत आहेत त्यांनी मला काँग्रेस किंवा पक्षाची निष्ठा शिकवण्याचा प्रयत्न करू नये आपण आयुष्यभर काँग्रेस पक्षाबरोबर राहिलो आहोत आणि मरेपर्यंत काँग्रेस पक्षांमध्येच राहणार आहोत कोणत्याही भाजपने त्याबरोबर आपला संपर्क झालेला नाही किंवा होणार नाही त्यामुळे आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत पक्षाकडे रीतसर मागणी देखील केली आहे काँग्रेस पक्षामध्ये एखाद्याला टार्गेट करण्याची पद्धत कधीच नव्हती. आजही नाही परंतु काही लोक गैरसमज पसरवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहे. असे सांगून या पत्रकार परिषदेमध्ये मधुकरराव चव्हाण यांनी खंबीरपणे आपली बाजू मांडली. आपण कोणाच्या विरोधात तक्रार करत नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी असे देखील त्यांनी सांगितले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. तुळजापूर येथे जरांगे पाटील आले तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या मागणीला आपला पाठिंबा दिलेला आहे आज त्यांचे उपोषण सुरू असताना त्यांना होणारा त्रास आणि त्याचे परिणाम याविषयी सरकार गंभीर नसल्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगून या संदर्भात सर्व जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल असे सांगितले. गोरगरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी आरक्षणात महत्त्वाचे आहे असे देखील त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना त्याचबरोबर मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्याला आपला जिल्हा आपले कुटुंब समजून आपण निधी दिलेला आहे मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेले विषय देखील सोडवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले सत्ता हातामध्ये असताना कधी देखील आपण पक्षीय राजकारण केले नाही निवडणुका संपल्या की पक्षी राजकारण संपले त्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी आणि गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी काम करायचे असते हा काँग्रेसने शिकवलेला धर्म आपण आयुष्यभर पाळला आहे. काँग्रेस पक्षाने या संपूर्ण परिसराला पाणी देण्याचे काम केलेले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 126 लहान मोठे तलाव बांधले आठ दहा किलोमीटर पाणी थांबेल असे विशाल विस्तृत बॅरेजेस बांधले ज्यामुळे आज तुळजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाच्या शेजारी पाणी दिसते आहे या पाण्यावर आधारित शेतीचे उत्पन्न वाढवण्यामध्ये त्याचबरोबर कोरडवाहू शेती बागायती करण्यासाठी केलेले काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विजयासाठी महत्त्वाचे आहे ज्याला पाणी मिळाले आहेत तो कोणताही माणूस मला विसरणार नाही याची मला जाणीव आहे मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे पाणी दिलेले आहे त्यामुळे या तालुक्यातील जनता मला आणि काँग्रेस पक्षाला कधी विसरणार नाही अनेक पिढ्या आणि अनेक वर्ष हे पाणी शेतकऱ्याच्या आणि शेतीला उपयोगी पडणारे आहे ज्या ठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती असे अनेक गावे आज टँकर मुक्त झाले आहेत ही किमया आपण करून दाखवली सर्वात जास्त निधी सिंचनाच्या कामासाठी विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला त्यामुळे आपण हे काम करू शकलो तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण दोन वेळा राबवलेला आहे विलासराव देशमुख यांनी 325 कोटी रुपयांचा विकास आराखडा दिला आणि त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यामध्ये पंधरा कोटी रुपयांची वाढ करण्यात आली एवढा प्रचंड निधी तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दिल्यामुळे आज तुळजापूर शहरातील सर्व रस्ते आणि भक्तनिवास त्याचबरोबर भूमिगत गटारी रस्त्यावरील विद्युत रोषणाई स्वच्छता आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा इतर शहराच्या तुलनेमध्ये अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज आहेत नगर परिषदेला देखील आपण केलेले मदत विसरता येणार नाही. तुळजाभवानी मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच तुळजापूर येथील पुजारी मंडळ आणि पुजारी बांधव यांच्यासाठी मागील पन्नास वर्षांमध्ये जे जे लोकांच्या हिताचे आहे तेथे करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे पुजारी व्यवसाय आणि स्थानिक व्यापाऱ्यांना योग्य सहकार्य करून आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही अधिकाराला गदा येऊ दिली नाही प्रत्येक वेळी आपण पुजारी बांधव आणि व्यापारी बांधव यांची बाजू घेऊन सरकार बरोबर संघर्ष केला आहे अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपली प्रतिष्ठा पणाला लावून तुळजापूर शहर आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिष्ठेसाठी आपण संघर्ष केला आहे विधानसभेच्या सभागृहांमध्ये देखील पाण्यापासून अनेक विषयावर केलेली भाषणे आज रेकॉर्डवर आहेत याची जाणीव देखील सर्वांनी ठेवावी असे मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान अनौपचारिक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे यांनी सांगितले की मराठवाड्यामध्ये मागील 30 वर्षांमध्ये एकाही आमदारांनी मधुकरराव चव्हाण यांच्या एवढे विकास काम आणि शासनाचा निधी खर्च केला नाही ही बाब वास्तव आहे आज तालुक्यामध्ये सर्व गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत सर्व गावाला रस्ते देखील मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात बनलेले आहेत ग्रामीण भागाला अडचणीच्या काळात साथ देणारा नेता अशी त्यांची ओळख आहे येणाऱ्या काळात ते पक्ष सोडणार नाहीत आणि आम्ही देखील त्यांना सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाने मधुकरराव चव्हाण यांनाच उमेदवारी द्यावी असा आम्ही पक्षाकडे आग्रह देखील केलेला आहे असे सांगितले. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये सर्व भागांमध्ये मधुकरराव चव्हाण यांचे काम आहे सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केल्यामुळे आज तळागाळात मधुकरराव चव्हाण यांच्या नावाला मोठी गर्दी आहे. ग्रामीण भागामध्ये चव्हाण साहेबांची लाट उसळी आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते निश्चितपणे काँग्रेसचा झेंडा विजयी करतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे असे सांगितले.
काँग्रेसचे नेत ऋषिकेश अशोकराव मगर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मधुकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करीत तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविक भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून केलेला विकास हा तुळजापूर शहर आणि पाहिला आहे मागील पाच वर्षांमध्ये त्यातील अनेक विकास कामे अपूर्ण राहिली चव्हाण साहेब जर या पाच वर्षांमध्ये आमदार राहिले असते तर निश्चितपणे तो निधी खर्च झाला असता आणि ज्या गोष्टीसाठी आज आपण संघर्ष करीत आहोत तो संघर्ष देखील आपल्याला करावा लागला नसता असे सांगून मधुकरराव चव्हाण साहेब यांनी या काळात स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांच्याबरोबर संपर्क ठेवून त्यांच्या विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदय यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा केलेली आहे याची जाणीव नक्की या घटकांना आहे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मधुकरराव चव्हाण जो संघर्ष करतात तो कोणीही करू शकत नाही हे देखील संपूर्ण शहर आणि तालुक्याला माहित आहे असे सांगितले.