आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आवाहन
तुळजापूर /नळदुर्ग, दि. 14 – डॉक्टर सतीश महामुनी
शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मिती आणि इंधन निर्मिती या प्रकल्पासाठी नरेंद्र मोदी यांच्या विविध कृषी योजनांचा पाठपुरावा करावा निश्चित शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे. विकास कामांना प्राधान्य देणारे राणा जगजीत सिंह पाटील यांना आपल्या युवक मित्रांच्या भविष्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विजयी करणे गरजेचे आहे सर्व मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नळदुर्ग येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये केले.
आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारे, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने झटणारे, व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा करणारे आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबध्दता असणारे राणाजगजितसिंह पाटील हे आपल्या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. तुळजापूर आणि परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसह या भागाचा कायापालट करण्याची अफाट क्षमता त्यांच्यात आहे. अशा कार्यक्षम आणि आपल्या मतदारसंघासाठी कटिबध्द असलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथील मरीआई मैदानावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील, भाजपाचे जिल्हाध्यख संताजी चालुक्य, सुनील चव्हाण, अॅड. मिलिंद पाटील, नितीन काळे, नारायण नन्नवरे, रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, युवा सेनेचे निखील घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शफीभाई शेख, गोकुळ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, मराठा सेवा संघाचे सज्जन साळुंके, प्रभाकर मुळे, विक्रम देशमुख, निहाल काझी, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, दीपक घोडके, दत्ता राजमाने, शिवदास कांबळे, सचिन पाटील, सुशांत भूमकर, संजय बताले, नय्यर जहागिरदार, बाळासाहेब शामराज, उमेश गवते, यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.
ही जनतेच्या भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. मागील दहा वर्षांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्याला आपण रस्ते विकासासाठी साडेसहा हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे. एकट्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सात कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी पाच हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे. नळदुर्ग-तुळजापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी दिली आहे. त्याची निविदाही निश्चित झाली आहे. निवडणुकीनंतर या कामास तत्काळ सुरूवात होईल. धाराशिव जिल्ह्यात साडेसहा हजार कोटी रूपयांची एकूण 24 कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी 11 कामे पूर्ण झाली असून 13 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आपण या खात्याचा मंत्री होण्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात 195 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग होता. आता तो 418 किलोमीटर लांबीचा झाला आहे. मागील 10 वर्षांत एकट्या धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 223 किलोमीटर इतकी वाढली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. सोलापूर-येडशी या100 किलोमीटर अंतराच्या राश्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. सतराशे कोटी रूपये खर्चून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एक सुंदर महामार्ग साकारला गेल्याचे समाधान असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोन हजार कोटी रूपयांचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे, ही आनंदाची बाब आहे. तीर्थाटन अर्थात पर्यटन वाढले की, रोजगार निर्मिती आपोआप होते. आमदार पाटील यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ही सगळी कामे करताना कोणताही दुजाभाव केला जात नाही. लाडकी बहिण, मोफत गॅस सिलेंडर, अशा सगळ्या योजना देताना मुस्लिम आणि दलितांंना अजिबात वगळलेले नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाचा सन्मान करणे हा भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. जातीयवादावर आमचा विश्वास नाही. ज्या प्रवर्गांचे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे, त्यांना जरूर सवलती मिळायला हव्यात, असेही गडकरी यांनी नमुद केले. संविधान बदलाच्या खोट्या अफवा पसरविणार्या काँग्रेसने मुस्लिमांना काय दिले? पानटपरी आणि चहाचा ठेला आपण मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र अभियांत्रिकी महाविद्यालय दिले. शिका, समृध्द व्हा, ज्ञान ही शक्ती आहे. त्यातूनच समृध्दतेचा मार्ग समोर येतो, असा व्यापक विचार मुस्लिम बांधवांसाठी आम्ही केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
चौकट
नळदुर्ग-अक्कलकोट मार्गाच्या भूसंपादनासाठी 66 कोटी
अनेक वर्षांपासून रखडलेल्या नळदुर्ग-अक्कलकोट मार्गाचा प्रश्न आता लवकरच दूर होणार आहे. 40 किलोमीटर अंतराच्या या मार्गावरील 10 मीटर जागेच्या वाढीव भूसंपादनापोटी शेतकर्यांना 66 कोटी रूपयांचा मावेजा देण्याच्या प्रस्तावाला आपण मंजुरी दिली आहे. यापूर्वी भूसंपादन करताना शेतकर्यांचे पैसे दिले गेले नव्हते. त्यामुळे अनेकजण उच्च न्यायालयात गेले होते. शेतकर्यांचा प्रश्न ध्यानात घेवून वाढीव मावेजा देण्यासाठी आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील 10 वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे आणि बाधित शेतकर्यांना वाढीव मावेजापोटी 66 कोटी रूपये मिळणार असल्याचेही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.