एकल संवादिनी वादनातून गुरू पुण्यात अभिवादन
पुणे दि १६ डॉ. सतीश महामुनी
पुणे : गुरूंविषयी अपार श्रद्धा व्यक्त करीत कृतज्ञतेच्या भावनेतून प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या शिष्यांनी एकल संवादिनी वादनातून आपली सेवा गुरुचरणी अर्पण केली.
प्रसिद्ध संवादिनी वादक आणि गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे शिष्य परिवारातर्फे दोन दिवसीय गुरू अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला होता.
स्वरदा मिशाळ, मयुरेश गाडगीळ, ऋषिकेश पुजारी, सुखदा पटवर्धन, स्वरूप दिवाण, हर्षल काटदरे, अभिनय रवंदे, मिलिंद कुलकर्णी, आर्यन देशपांडे, ओंकार उजगारे, संकेत सुवर्णपाठकी, ऋचा देशपांडे, अभिषेक शिनकर, रोहित मराठे, तन्मय देवचके यांचे या सोहळ्यात एकल संवादिनी वादन झाले. सागर पटोकार, कार्तिक स्वामी, प्रसन्न भुरे, सोहम गोराणे, कुमार धोकटे यांची तबलासाथ होती.
मधुवंती, भीमपलास, जनसंमोहिनी, रागेश्री, मालकंस, बिहाग, जोग, बागेश्री, भूप आणि झिंझोटी या रागांचे तसेच विविध नाट्यपदांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी या प्रसंगी केले.
मयुरेश गाडगीळ याने ऑर्गनवर ‘मन राम रंगी रंगले’ आणि ‘खरा तो प्रेमा’ ही दोन नाट्यगीते ऐकवून उपस्थितांना विशेष आनंद दिला. मिलिंद कुलकर्णी यांनी गुरुंनी दिलेल्या ज्ञानातून उर्मी घेत राग किरवाणी व राग जोग यांचे मिश्रण असलेली स्वत: रचलेली रचना ऐकवली. ज्याला त्यांनी संजोग असे नाव दिले आहे.
रोहित मराठे यांनी पंडित प्रमोद मराठे यांची राग भूपमधील तीन तालातील गत तयारीने सादर केली. तर तन्मय देवचके यांनी 15 ऑगस्टचे निमित्त साधून देस रागामध्ये बांधलेल्या ‘वंदे मातरम्’ची झलक ऐकविली. उपस्थित रसिकांनी त्यास गायनातून साथ दिली. तन्मय यांनी संवादिनी वादनात तबला, की-बोर्ड (जय सूर्यवंशी) आणि टाळ (अथर्व कुलकर्णी) यांच्या साथीने संवादिनी वादनातील अनोखा प्रयोग सादर केला. त्यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
पंडित प्रमोद मराठे व गांधर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य परिणिता मराठे यांचे पूजन शिष्यांनी पंचारतीने केले.
रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या वडिलांचा सुमारे 150 वर्षे जुना ऑर्गन महाविद्यालयाला भेट मिळाला त्या वेळी पंडित तुळशीदास बोरकर यांनी स्वत: त्यावर एक तास वादन केले, ही आठवण पंडित प्रमोद मराठे यांनी सांगितली. संकेत सुवर्णपाठकी याने सादर केलेला तराणा पंडित बळवंतराय भट्ट यांचा असून तो विदुषी विणाताई सहस्त्रबुद्धे गात असत. मी त्यांच्याकडून हा तराणा शिकलो व पुढे शिष्यांनाही शिकवत आहे. अशा तऱ्हेने संगीत विद्या प्रवाही ठेवली असल्याचे ते म्हणाले.
गांधर्व महाविद्यालयातर्फे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांना सहकार्य म्हणून पंडित मराठे यांचे शिष्य रवी गोडसे यांनी आर्थिक सहाय्य दिले. कलाकारांचा सत्कार डॉ. प्रकाश कुलकर्णी, संजीव जोशी, अविनाश बेडेकर, सुभाष इनामदार, परिणिता मराठे, पंडित प्रमोद मराठे यांच्या हस्ते करण्यात आला. अभिषेक शिनकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन वैष्णवी पोवळे यांनी केले.
आपण विद्यार्थ्यांकडून कसून रियाज करून घेतला परंतु शिकवताना विद्यार्थ्यांना कधीही मानसिक ताण दिला नाही. विद्यार्थी मोकळेपणातून आपलेसे होतात यावर विश्वास आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या बुद्धिमत्तेनुसार ज्ञान ग्रहण केले आहे. माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांनी प्रगती होते असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.