तुळजापूर दि १७ डॉ. सतीश महामुनी यांज कडून
औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे द औंध सोशल फाउंडेशन व कलाश्री संगीत मंडळाच्यावतीने आयोजित भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी पंडित सुधाकर चव्हाण, द औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत गायकवाड, पं. रामराव गुरुजी, नंदकिशोर ढोरे, सुधीर रंभाडकर, गिरीश नाईकडे, समीर महाजन, प्रणाली विचारे, सच्चिदानंद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी गायक श्रीनिवास जोशी यांनी राग मारवाने महोत्सवाची सुरुवात करीत रसिकांना भारावून टाकले. तर अभंग ‘पंढरी निवासा सखा पांडुरंग’ गात आपल्या गायनाची सांगता केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पांडुरंग पवार, तर पखवाजवर गंभीर महाराज यांनी संगीत साथ केली.
संगीतातील अनोख्या प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहिनी वाद्यवृंद ग्रुपने आपल्या सादरीकरणाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. गायिका रुचिरा केदार यांनी सतारवादक साहाना बॅनर्जी यांच्यासमवेत राग मारू बिहागमध्ये ‘परी मोरी नाव’ बंदिश सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. तसेच प्रसिद्ध बंदिश ‘तरपत रैना दिन’, त्यानंतर राग मेघ व देस सादर करत रसिकांची मने जिंकली. तदनंतर ‘बीत जात बरखा ऋतु सजन नही आये’ ही बंदिश राग देसमध्ये सादर केली. तसेच मिया मल्हारही सादर केला. अनुजा बोरुडे यांनी पखवाजावर त्रिताल, सावनी तळवलकर यांनी तबल्यावर ताल त्रिताल सोलो वादन केले. अदिती गरडे (हार्मोनियम) यांनी संगीत साथ देत रसिकांनी मने जिंकली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘माझे माहेर पंढरी अभंगा’ने आपल्या सादरीकरणाची सांगता केली.
महोत्सवात पहिल्या दिवसाची सांगता गायक भुवनेश कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग जोग कंस विलंबित तालामध्ये सादरीकरण केले. तसेच राग खमाजमध्ये ठुमरीवर ‘सावरा मायी सावरा’ सादर करीत रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे यांनी, तर तबल्यावर प्रशांत पांडव यांनी संगीत साथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.
शास्त्रीय गायन आणि तबला वादनाने रंगला ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चा दुसरा दिवस
शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण यांनी सादर केलेली राग मूलतानी’मधील बंदिश व त्याला अभंगाची साथ, विदुषी देवकी पंडित यांनी सादर केलेली राग रागेश्री’तील बंदिश आणि तबला वादक अक्रम खान यांच्या सोलो तबलावादनाच्या सादरीकरणाने ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी एक स्वरमयी संध्याकाळ अनुभवली.
कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर, औंध येथे करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मूलतानी मधील ‘गोकुल गाम..’ ही बंदिश सादर केली. या बंदिशीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘पंढरीचे भुत..’ या अभंगाने तर पं. भीमसेन जोशी रंगमंदिर भक्ती भावाने भरून गेले होते. यावेळी गायिका शाश्वती चव्हाण यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर व तबल्यावर पांडुरंग पवार यांनी साथसांगत केली.
त्यानंतर तबला वादक अक्रम खान यांचे सोलो तबलावादन करण्यात आले. यावेळी त्यांनी त्रिताल पेशकार तालामध्ये अनेक प्रकारच्या ‘गता’ तसेच वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमवर निलय साळवी यांनी संगीतसाथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप विदुषी देवकी पंडित यांच्या गायनाने झाला. सुरवातीला त्यांनी रागेश्री रागातील ‘पलक न लागी..’ ही बडाख्यालमधील बंदिश सादर केली. त्यानंतर छोटा ख्यालमधील ‘मोर मन बस कर लिनो शाम’ ही त्रितालातील बंदिश सादर करण्यात आली. त्यानंतर ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ हे गाणे सादर करण्यात आले. यामध्ये रसिक प्रेक्षक तल्लीन झालेले पाहायला मिळाले. तर दिवसाची सांगता भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला..’ या अभंगाने झाली. यावेळी हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तर तबला आणि पखवाजवर रोहित मुजुमदार व गंभीर अवचार यांनी संगीतसाथ केली.