आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपूजन सोहळ्यात शिष्यांना शुभाशीर्वाद
पुणे दि १८ प्रतिनिधी
गुरू-शिष्य परंपरा ही अखंडित प्रक्रिया आहे. कला व्यक्त होत असताना प्रेरणा देणारी गुरुशक्ती बरोबरच असते. शिकविण्याची प्रक्रिया स्थूल स्तरावरची आणि सोपी असते, पण संस्कार करणे अवघड असते, असे प्रतिपादन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी केले.
आवर्तन गुरुकुलतर्फे तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील दुसऱ्या दिवशी गुरुपूजन सोहळ्यात शिष्यांना शुभाशीर्वाद देताना पंडित तळवलकर बोलत होते. पंडित तळवलकर यांच्यासह पंडित रामदास पळसुले, नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, नृत्यगुरू डॉ. शमा भाटे तसेच पंडित निषाद बाकरे यांच्या शिष्यांनी गुरुपूजन केले. कृष्णा साळुंखे, इशान परांजपे, स्वराली मोरे, मानसी जोग, श्रेया कुलकर्णी, श्रद्धा मुखडे, प्रथमेश अमरुळे, हेमंत जोशी, साहिल भोगले, मैथिली बापट यांनी गुरुपूजन केले. रमा कुकनूर आणि अमिरा पाटणकर यांचा शिरीष कौलगुड आणि अनिता संजीव यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आवर्तन गुरुकुलात गायन-वादन-नृत्य या कलांचे विद्यार्थ्यांना कुठल्याही मोबदल्याविना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून जातो. सुमारे सव्वाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणाद्वारे कलाकार म्हणून घडविले जात आहे. उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
तालयोगी पं. तळवलकर म्हणाले, कोणत्याही रचनेला दृष्टी प्राप्त होण्याकरिता गुरुंचे प्रयत्नच कारणीभूत असतात. शिष्याला एखादी रचना समजते ती अचूक सादर करता येते परंतु जोपर्यंत गुरू त्यात प्राण ओतत नाही तोपर्यंत ती आनंददायी होत नाही.
दुसऱ्या दिवसाच्या महोत्सवाची सुरुवात गुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्या शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने झाली. वृषाली चितळे-लेले, यशोदा पाटणकर, रमा कुकनूर, मुग्धा असनिकर, वैशाली टांक, ऋचा आठवले, विकिराज कादळे, स्वराली मोरे, सृष्टी अवदूतकर, प्राजक्ता राजुरकर यांचा सहभाग होता. नृत्य सादरीकरणाची सुरुवात अभिनय दर्पणमधील ‘विघ्नानाम् नाशनम् कर्तुम’ या लोकाने झाली. त्यानंतर भरतनाट्यम् नृत्यपरंपरेतील रंजक व मौलिक ठेवा असलेल्या मराठी वर्णम्चे सादरीकरण झाले. राग, उपहास, मत्सर अशा विविध भावभावनांच्या छटा दर्शविणारी ही रचना सरफोजी राजे यांची होती. लहानग्या मुलीला पडलेला शंकराच्या डमरुचा मोह, त्यासाठी तिने पार्वतीपाशी केलेला हट्ट, ‘विनती माझी तूच करी देवी’ या शहाजीराजे (दोन) यांच्या रचनेतून दर्शविण्यात आली. त्यानंतर गुरू सुचेता भिडे-चापेकर यांची संरचना असलेला शोल्ल तिल्लाना सादर करण्यात आला. जीवनात सर्वात श्रेष्ठ काय याविषयी झालेली चर्चा आणि त्यातून सर्वश्रेष्ठ ठरलेली भक्ती असा विषय नृत्यप्रस्तुतीकरणातून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. नंदिनी राव-गुजर (गायन), मधुरमण कुट्टी (व्हायोलिन), यशवंत हंपीहोळी (मृदंगम्) यांनी साथसंगत केली. निवेदन मानसी जोग यांनी केले.
यानंतर गुरू तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य सुमित पांचाळ, सिद्धार्थ कुंभोजकर, प्रसाद महाजन, रोहन इनामदार, रोहित श्रीवन, मिहिर विद्वांस, साहिल डुंबरे, रुद्राक्ष श्रीवास्तव, कौस्तुभ स्वैन यांनी ताल रुपक प्रभावीपणे सादर केला. लेहरासाथ अमेय बिच्चू यांनी केली.
दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात भारतीय व विदेशी तालवाद्यांचा अनोखा मिलाफ रसिकांनी अनुभवला. आदित्य काननगो (ड्रम्स), सोहम साने (जेंबे), पार्थ भूमकर (पखवाज), रोहित खवळे (ढोलकी), जगमित्र लिंगाडे (तबला), ऋतुराज हिंगे (कलाबश), वेदांग जोशी (पेंडेरा), इशान परांजपे (कजॉन) यांनी तीनताल सादर केला. त्यांना यशवंत थिट्टे यांनी संवादिनी साथ केली. या अनोख्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.
फोटो ओळ : गुरुपूजन सोहळ्यात शिष्यांना शुभाशीर्वाद देताना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर. समवेत पंडित निषाद बाकरे, गुरू शमा भाटे, गुरू सुचेता भिडे-चापेकर, पंडित रामदास पळसुले.