धाराशिव सायबर पोलीस स्टेशनची यशस्वी कामगिरी
हॉटेल व्यवसायिकाचे लाखो रुपये परत मिळवून दिले
धाराशिव.दि.20 प्रतिनिधी
धाराशिव शहरातील एका हॉटेल व्यावसायिकास सायबर भामट्यांनी ६ लाख ९८ हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घातला होता. ही फसवणुकीची घटना जून २०२३ मध्ये घडली होती. सायबर पोलीसांनी तपास करून फिर्यादीला ५ लाख १८ हजार रूपये परत मिळवून दिले आहेत. सायबर पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल सहा लाख रुपयांचा गंडा घातला होता. सायबर भामट्यांनी हॉटेल चालकाला आर्मी ऑफीसर असल्याचे भासवून रुम बुक करण्याचा बहाणा केला. ऑनलाईन पैसे पाठवणे कामी आमची आर्मीची प्रोसिजर वेगळी आहे, असे सांगून एक पेटीएम ची लिंक सेंड केली. या लिंकवर जावून फिर्यादीस बँकेची माहिती टाकल्यावर आपले पैसे मिळतील, असे सांगितले. बनावट लिंकद्वारे आरोपींनी तब्बल ६ लाख ९८ हजार रूपये फिर्यादी यांचे खातेवरून काढून ऑनलाईन फसवणूक केली होती.
हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक बी. एस. वाकडकर यांनी केला. त्यांना तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण मदतीसाठी सपोनि सचिन पंडीत, पोउपनि ए. आर. जाधव, पोलीस हवालदार गणेश जाधव, पोलीस अमलदार शशीकांत हजारे, पोलीस अमलदार प्रकाश भोसले, पोलीस हवल दार अनिल भोसले यांनी सहकार्य केले. तपासादरम्यान फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या रक्कमपैकी ५ लाख १८ हजार रूपये फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. गुन्ह्याचा तपास अद्याप सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सायबर पोलीसांनी आवाहन केले की, कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नये तसेच आपला खाते क्रमांक, ओटीपी किंवा इतर वैयक्तीक माहिती आनोळखी लिंकवर ओपन करु नये. संशय वाटल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.