पुणे दि १८ प्रतिनिधी
दमदार पखवाज वादन, बहारदार तबला वादन आणि सुरेल गायनाने आवर्तन गुरुकुल आयोजित तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली. गुरुंनी दिलेले ज्ञान गुरुंच्या चरणी अर्पण करून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला गुरुजनांनी उत्स्फूर्तपणे कौतुकाची थाप दिली.
आवर्तन गुरुकुलात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित रामदास पळसुले, नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, नृत्यगुरू डॉ. शमा भाटे तसेच पंडित निषाद बाकरे यांच्याकडून मार्गदर्शन घेत असलेल्या शिष्यवर्गाचे उत्सवात सादरीकरण होत आहे. शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आवर्तन गुरुकुलात गायन-वादन-नृत्य या कलांचे विद्यार्थ्यांना कुठल्याही मोबदल्याविना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून जातो. सुमारे सव्वाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणाद्वारे कलाकार म्हणून घडविले जात आहे. महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
महोत्सवाची सुरुवात तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य कृष्णा साळुंखे, प्रथमेश तारळकर, पार्थ भूमकर, रोहित खरवंडिकर यांच्या आदितालातील पखवाज वादनाने झाली. कृष्णा साळुंखे याने हनुमान परण, कालीमाता परण, रुख्मिणी परण, विठ्ठल परण आणि शिवकाव्याचे बोल सादर केल्यानंतर त्याच्यासह इतर वादकांनी पखवाज वादनातून या रचना अतिशय ताकदीने सादर केल्या. त्याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
या नंतर गुरुंप्रति शरणभावाने तबलावादक इशान परांजपे, जगमित्र लिंगाडे, भार्गव देशमुख, वेदांग जोशी, कौस्तुभ स्वैन, चिन्मन लेले, अनिश थत्ते, हर्ष ताम्हणकर यांनी वादन केले. अतिशय ताकदीसह तसेच नजाकतीने तीन ताल सादर करून रसिकांना मोहित केले. पखवाज आणि तबलावादकांना अमेय बिच्चू यांनी लेहरासाथ केली.
गुरूंचा वसा पुढे नेताना गायक पंडित निषाद बाकरे यांचे शिष्य साहिल भोगले याने सुरेल गायन सादर केले. त्याने जोगकंस रागातील ‘सुघर बर पायो’ तसेच गुणीदास यांची ‘पीड पराई जाने ना’ ही रचना सादर केली. त्यानंतर राग शहाणा कानडामधील ‘मोरी आली है रे उमर कलाई’ ही सदारंग यांची बंदिश तसेच ‘बिजली चमके बरसे मेहरवा’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. यश खडके (हार्मोनियम), श्रीराज ताम्हणकर (तबला), अथर्व गोडसे, इशान मुळे (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.
गुरुंचे मोलाचे मार्गदर्शन, गुरुंप्रति शरणभाव, कलेप्रति समर्पणभाव आणि स्वप्रतिभा शिष्यांच्या सादरीकरणातून जाणवली. सहकलाकारांचा सत्कार पंडित रामदास पळसुले आणि गुरू सुतेचा भिडे-चापेकर यांनी केला.
सुरुवातीस पंडित सुरेश तळवलकर, पंडित रामदास पळसुले, नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, पंडित निषाद बाकरे, शिरीष कौलगुड, अनिता संजीव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.