मनोज जरांगे यांच्या आदेशाने महंत तुकोजी महाराज तुळजापूर विधानसभा लढवण्याचे तयारीत
तुळजापूर दिनांक 27 प्रतिनिधी
महंत तुकोजी महाराज तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण युवक नेते विनोद गंगणे यांनी तुकोजी महाराज यांच्यासाठी काल बोलावलेल्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे महंत तुकोजी महाराज यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांनी उमेदवारी दिल्यास निश्चितपणे महंत तुकोजी महाराज निवडणूक लढवणार असल्याची माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जारंगे यांनी तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली तर तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील महंत तुकोजी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील यासाठी तुळजापूर येथील स्कायलंड हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. या बैठकीला सुमारे 300 कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सांगितले आहे या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महंत तुकोजी महाराज निवडणूक लढवण्याची तयारी ठेवून आहेत यासाठी मनोज जरांगे यांनी आदेश देणे गरजेचे आहे.
कोणत्याही क्षणी मनोज जारंगे यांचा महाराजांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश आला तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी आहे का आणि आपली तयारी असेल तर कार्यकर्त्याची संमती आणि महंत तुकोजी महाराज यांची निवडणूक लढवण्यासाठी संमती असल्याचे निश्चित होईल या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आणि सर्वानुमते आदेश आला तर निवडणूक लढवायचीच असा निर्णय केलेला आहे.
हॉटेल स्कायलंड येथे झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते महंत तुकोजी महाराज यांनी राजकीय भूमिका घ्यावी तुळजापूर शहराच्या विकासासाठी त्याचबरोबर समर्थकांची मागणी लक्षात घेऊन ही मागणी पुढे करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन म्हणून महाराजांनी उमेदवारी घ्यावी अशी मागणी या समर्थकांनी यावेळी केली आहे. तुळजापूर शहरातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांची देखील या बैठकीला उपस्थित होती.
महायुतीकडून आमदार राणा जगजीतसिंह पाटील व महाविकास आघाडी कडून धीरज पाटील हे दोन उमेदवार घोषित झालेले आहेत. या दोघांच्या समोर मराठा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने महंत तुकोजी महाराज यांनी उमेदवारी केली तर मत विभागणीचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल याविषयी विधानसभा मतदारसंघांमध्ये चर्चा रंगली आहे.