तुळजापूर दि.१७: शिवसेनेच्या नेत्या तथा विधान उप उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेचे औचित्य साधत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा विधीवत करत देवीला साडीचोळी अर्पण केली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, संपूर्ण जगात आदिशक्तीचा नवरात्र उत्सव सुरू आहे. देवीच्या प्रत्येक रुपात तिची वेगवेगळी वाहने आणि शस्त्रे आहेत. तसंच महिलांची शक्ती पुढे येण्यासाठी, स्त्रियांची विषमतेपासून मुक्ती होण्याकरिता शस्त्राप्रमाणेच वेगवेगळ्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या यंत्रणांचा वापर करण्यात येईल. अशा प्रकारच्या शुभेच्छा राज्यातील भगिनींना आणि बांधवांना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व श्री अजितदादा पवार यांनी महिला सशक्तीकरणाची मोहीम राज्यात सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘नारी चेतना यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा सहा जिल्ह्यांमध्ये जाणार असून यात्रेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये शासकीय अधिकारी, महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजना तसेच शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील आणि या शासनाच्या योजना महिलापर्यंत पोचविण्यासाठी शिवदूत म्हणून महिलांनी काम करण्याचे या यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
Post Views: 301