नळदुर्ग दि २४ प्रतिनिधी
राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले श्री.उमाकांत मिटकर यांची कन्या कु. सिद्धी हिच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे महिलांच्या खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. यावाढदिवसाच्या निमित्ताने सर्व वयोगटातील विद्यार्थी व महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
वागदरी गावातील महिला व मुलींच्या कलागुणांना चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी नळदुर्ग व तुळजापूर येथील संस्कार भारतीची टीम व जि.प.प्रा.शाळा वागदरी यांचे सहकार्य लाभले.प्रथम,द्वितीय, व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 2500/-2100/- व 1500/- रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास गृहोपयोगी टिफिन डबा देण्यात आला.सद्गुगुरु भवानसींग महाराज मंदिरात पार पाडलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेस गावकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
मिटकर कुटुंबीय त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस हा कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक व धार्मिक कार्यास मदत करून साजरा करत असतो याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे मत संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत पदाधिकारी डॉ.सतीश महामुनी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्कार भारती जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर मोकाशे प्रफ्फुलकुमार शेटे यांची उपस्थिती होती.