तुळजाभवानी देवीच्या लाखो भक्तासाठी तुळजापुरात राज्य शासनाचे महाआरोग्य शिबिर, आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांचा महत्त्वकांक्षी उपक्रम

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाआरोग्य शिबिर स्थळाची पाहणी

धाराशिव दि 26 जिमाका) तुळजापूर येथील घाटशीळ पायथा येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिर स्थळाची आज 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी शिवाजी सावंत, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओम्बासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या. तीन दिवस चालणाऱ्या महाआरोग्य शिबिरात जवळपास 3 लक्ष नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्हयासह शेजारच्या इतर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक व तेलंगणा राज्यातील नागरिक देखील या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेणार आहे.त्यामुळे महाआरोग्य शिबिराला येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
डॉ.ओम्बासे यांनी यावेळी महाआरोग्य शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांची शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची तसेच भोजन व्यवस्थेची पाहणी केली.महाआरोग्य शिबीरासाठी उपलब्ध झालेला औषध साठ्याची पाहणी करून कोणकोणत्या औषधी व गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत याची माहिती त्यांनी घेतली.
मुख्य कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबिरासाठी तयार केलेल्या नोंदणी विभाग, सर्वसाधारण तपासणी,औषधी वाटप, ईसीजी विभाग,अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग विभाग,शल्यचिकित्सा विभाग, हिरकणी कक्ष,सोनोग्राफी विभाग,बालरोग विभाग,मानसिक आजार विभाग,त्वचा व गुप्तरोग विभाग,दंतरोग विभाग,नेत्र विभाग, आयसीयू कक्ष,कान,नाक,घसा विभाग,क्ष- किरण विभाग,वॉर रूम व मदत कक्षाची पाहणी डॉ.ओम्बासे यांनी केली.
या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी,हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी,दंत तपासणी, औषधी वितरण,हृदयरोग तपासणी, रक्तक्षय तपासणी,कान,नाक,घसा तपासणी,चष्म्याचे वितरण,रक्तगट तपासणी,इसीजी,आयुष्यमान कार्ड व आभा कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
या शिबिरात 147 तज्ञ शल्यचिकित्सक डॉक्टर्स,189 एमबीबीएस डॉक्टर्स,649 बीएएमएस/ सामुदायिक आरोग्य अधिकारी,105 नेत्ररोग वैद्यकीय अधिकारी,101 फार्मसी अधिकारी आणि 1696 इतर आरोग्य कर्मचारी असे एकूण 2887 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपली सेवा या महाआरोग्य शिबिरात देणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *