आश्वासक युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
पुणे दिनांक १९ प्रतिनिधी लयतालाच्या असंख्य भावमुद्रा दर्शवत बहारदार कथक नृत्याचे सादरीकरण, युवा शास्त्रीय गायिकेचे सुरेल गायन तर आश्वासक युवा तबलावादकांच्या दमदार सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
आवर्तन गुरुकुल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात तिसऱ्या दिवशी (रविवारी) गुरू शमा भाटे यांच्या विद्यार्थिनींची कथक नृत्यप्रस्तुती, पंडित निषाद बाकरे यांच्या शिष्येचे गायन तर पंडित रामदास पळसुले यांच्या शिष्यांचे तबलावादन झाले. आवर्तन गुरुकुलात गायन-वादन-नृत्य या कलांचे विद्यार्थ्यांना कुठल्याही मोबदल्याविना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून जातो. सुमारे सव्वाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षणाद्वारे कलाकार म्हणून घडविले जात आहे. उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात कथक नृत्याच्या सादरीकरणाने झाली. गुरू शमा भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या अमिरा पाटणकर यांनी ‘शंकर आदि देव शंभू भोलानाथ’ या शिवस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर दहा मात्रांच्या झपतालाचे सादरीकरण केले. त्यात आमद, नटवरी, तत्कार, चलन दर्शविले. त्यानंतर गजेंद्र अहिरे लिखित ‘ऐसी मोरी रंगी है श्याम’ ही ठुमारी कथकमधील अभिनयाचे अंग दर्शवित अतिशय प्रभावीपणे सादर केली. श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, नयन कोहळे आणि प्रमोद वाघ या शिष्यांनी राग बसंतमधील ‘देरे देरे ना देरे’ हा तराणा सादर केला. उत्तम पदन्यास, पढंत, अभिनय हे सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. आशय कुलकर्णी (तबला), यशवंत थिट्टे (संवादिनी), शुभम खंडाळकर (गायन), अनन्या गोवित्रीकर (पढंत) यांनी साथ केली.
पंडित निषाद बाकरे यांची शिष्या मैथिली बापट हिने गायन मैफलीची सुरुवात राग मुलतानीमधील विलंबित ख्याल आणि तिलवाड्यातील तीन तालातील ‘ए अनाडी ठाडी थाट’ या बंदिशीने केली. त्यानंतर राग तिलककामोदमधील ‘सूर संगत राग विद्या’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. त्याला जोडून द्रुत लयीत ‘कोयलिया बोले अंबुवा कि डालरिया’ ही बंदिश सादर केली. पार्थ ताराबादकर (तबला), यश खडके (संवादिनी) यांनी साथ केली.
कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रातील पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य हेमंत जोशी, पंचम उपाध्याय आणि अद्वैत जोशी यांनी सादर केलेले तबलावादन कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरले. त्यांनी ताल धुमाळी रूपक हा जोडताल अतिशय तयारीने सादर केला व रसिकांची वाहवा मिळविली. कृष्णा साळुंखे यांची एक रचनाही उत्तमरित्या सादर केली. यशवंत थिट्टे यांनी