प्रा. विवेक कोरे यांना राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पुरस्कार प्रदान
तुळजापूर दिनांक 3 प्रतिनिधी
तुळजाभवानी अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील प्रा. विवेक विलासराव कोरे यांना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 या स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारदर्शक प्राप्त झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील शिक्षकाने राज्यस्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच जिल्ह्याच्या शैक्षणिक दर्जाची खात्री सांगणारे आहे.
प्रा. विवेक कोरे तुळजाभवानी कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर येथे कार्यरत आहेत. संशोधन आणि निर्मिती याच्यामध्ये प्रचंड रस असणारा प्राध्यापक त्याचबरोबर आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील घटकांना देण्यासाठी सतत प्रयत्न करणारा शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. आपल्या शब्दावर आणि वाणीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व आहे. उत्तम विचारवंत व प्रभावी वक्ता असा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्यांनी निर्माण केलेले शैक्षणिक व्हिडिओ अत्यंत दर्जेदार आहेत आणि त्याचा लाभ त्यांच्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून मिळतो आहे. युट्युब वर देखील प्रा. विवेक कोरे यांची विशेष” क्रेझ “आहे त्यांना फॉलो करणारा खूप मोठा जिज्ञासू समूह त्यांच्यासोबत जोडलेला आहे.
प्रा. विवेक कोरे हे उत्तम वक्ते आणि निष्णात सूत्रसंचालक आहेत त्यांनी आपल्या अध्यापक महाविद्यालयातील सेवेमध्ये उत्तम साहित्य निर्मिती करीत विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्वाचे काम सातत्याने केली आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील हा शिक्षण क्षेत्रातील “कोहिनूर हिरा” आहे अशी त्यांची लोकप्रियता आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती या स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गासाठी या स्पर्धेच्या निमित्ताने प्रा. विवेक कोरे यांनी जे शैक्षणिक व्हिडिओ निर्माण केले आहेत ते राज्यस्तरावर दर्जेदार ठरले आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव शिक्षण व क्रीडा विभाग आय. ए. कुंदन, राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक राहुल रेखावार यांची उपस्थिती होती. विवेक कोरे यांनी या स्पर्धेसाठी एकूण पाच व्हिडिओ समाविष्ट केले होते त्यातील चार व्हिडिओंना पारितोषक यामध्ये एक राज्यस्तरीय व तीन जिल्हास्तरीय मिळालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , सचिव सौ शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे आयटी विभाग प्रमुख डॉ. शोभा मिसाळ, डॉ. शरीफ शेख, प्राचार्य एस. एन. दौंड यांनी अभिनंदन केले आहे.