काटीमधील विद्यार्थाची लंडनमध्ये किंग्सटन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड
काटी दि 9 उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्यार्थी चैतन्य संतोष साळुंके या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी लंडनच्या किंग्सटन युनिव्हर्सिटीत निवड झाली असून चैतन्य याने सोलापूर येथील तळे हिप्परगा येथील ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले तर 12 वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले आहे.
काटी येथील रहिवासी असलेल्या चैतन्य याचे वडील संतोष साळुंके हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदखेड जि. दक्षिण सोलापूर येथे सहशिक्षक आहेत तर आई वर्षा संतोष साळुंके या एकरुख ता.उत्तर सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत. चैतन्य साळुंके या काटीतील तरुणाने पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडन येथील किंग्सटन विद्यापीठात अर्ज केला होता.
चैतन्यची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता सदरील विद्यापीठाने त्याची ‘एमएससी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट’ या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे. तो पुढील शिक्षणासाठी 10 सप्टेंबर 2023 रोजी लंडनला रवाना होणार आहे.त्याने मिळविलेल्या यशाबद्दल धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.