कृष्णेतील हक्काच्या पाणी वितरणाची नियोजनबध्द आखणी पूर्ण
तुळजापुर दिनांक १२ डॉ. सतीश महामुनी
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर 2024 अखेरीस तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा प्रकल्पात दाखल होत आहे. त्यानंतर कृष्णेच्या पाणी वितरणाची पुढील आखणी पूर्ण झाली आहे. तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण 7078 हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे सिंचनाखाली येणार आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महायुती सरकारने पाठबळ दिल्यामुळे रामदरा ते बोरी-एकुरगा या टप्पा क्र. 6 मधील पाणी वितरणाच्या कामाला आता वेग आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
कृष्णा खोर्यात मराठवाड्याचा 10 टक्के भूभाग आहे. त्यामुळे कृष्णा खोर्यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय्य हक्क आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा खोर्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी 2001 साली मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णयाला मंजुरी मिळवून घेतली. या कामाची ठामपणे आपण जबाबदारी स्वीकारली. ती आता पूर्णत्वाकडे जात आहे. हक्काच्या 23.66 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महायुती सरकारने 11 हजार 726 कोटी रूपयांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सिंदफळ येथील पंपगृहातून डिसेंबर 2024 अखेरीस 2.24 टीएमसी पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात दाखल होत आहे. रामदरा येथून हे पाणी बोरी-एकुरगा आणि तेथून बंद पाईपलाईनद्वारे तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
पाणी वितरणाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून प्राधान्यक्रम मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात सगळी कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात नव्याने बांधकाम केलेले आणि यापूर्वी अस्तित्वात असलेल्या एकूण 10 साठवण तलाव आणि बॅरेजेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेले हे पाणी साठवले जाणार आहे. त्यानुसार अस्तित्वात असलेल्या साठवण तलावांची संख्या आठ एवढी असून नव्याने दोन बॅरेजेस तयार करण्यात आले आहेत. तुळजापूर तालुक्यातील दोन हजार 874 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र कृष्णेच्या पाण्यामुळे निर्माण होत आहे. तर उमरगा तालुक्यातील दोन हजार 57 हेक्टर आणि लोहारा तालुक्यातील दोन हजार 147 हेक्टर क्षेत्र कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार आहे. जोड कालव्याद्वारे आठ साठवण तलाव आणि दोन बॅरेजेसपर्यंत पाणी वितरण करण्याची आखणी पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी सांगितली.
चौकट –
असे होणार पाण्याचे वितरण
सिंदफळ येथील पंपगृहातून रामदरा तलावापर्यंतचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आहे. डिसेंबरअखेरीस हे पाणी रामदरा तलावात येवून पडेल. त्यानंतर पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर, लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यांतील साधारणतः सात हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी साधारणपणे 85 किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामदरा येथील पंपगृहातून उपसा सिंचन पध्दतीने पाणी उचलून बोरी-एकुरगा गावापर्यंत रस्त्याच्या दुसर्या बाजूला नेले जाणार आहे. तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणाऱ्या आठ तलाव आणि दोन बॅरेजेस मध्ये भरून घेतले जाणार आहे.आहे.ज्यामुळे खर्च कमी लागणार आहे.पुढे ते बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याचे प्रस्तवित आहे त्यामुळे सिंचन क्षमतेत 40% वाढ होणार आहे.परिणामी सिंचन क्षेत्र 10 हजार हेक्टर पर्यंत वाढणार आहे. या दहा स्टोरेज टँकची एकूण क्षमता दोन टीएमसीपेक्षा अधिक असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.