छत्रपती संभाजीनगर आणि जालना म्हणजे संपूर्ण मराठवाडा आहे का ?
तुळजापुर दि ८ डॉ. सतीश महामुनी यांज कडून
देशाच्या वेगवेगळ्या अविकसित भागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील डबल इंजन सरकारने विविध विकास योजना राबवून त्या त्या राज्यांना विकसित होण्याच्या मार्गावर आणले आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या नियोजनामध्ये मराठवाडा या आठ जिल्ह्याच्या महसुली प्रदेशांमध्ये नुकताच लातूर रोड ते नांदेड या रेल्वे मार्गाला मान्यता दिली गेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि मुंबई कोकण याचा विचार केला तर मुंबई कोकण या भागांमध्ये रेल्वेचे जाळे अंतरले गेले आहे येथील शहरी भागात राहणारे रहिवासी केवळ पाच आणि दहा रुपये देऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास रेल्वेने करतात गणपतीच्या उत्सवाला देखील ही मंडळी रेल्वे जातात त्यांना दिवाळी आणि गणपती साठी विशेष रेल्वे गाड्या देखील सोडल्या जातात या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील खूप मोठा वर्ग शहरी भागामध्ये स्थलांतरित झाला आहे पुणे आणि मुंबई तसेच नाशिक या औद्योगिक पट्ट्यामध्ये हजारो मराठवाड्यातील युवक आणि नागरिक रोजी रोटी साठी स्थायिक झाले आहेत जेव्हा मराठवाड्यातील ही मंडळी खूप मोठ्या संख्येने दिवाळी गणपती आणि सलग येणाऱ्या सुट्टीच्या निमित्ताने प्रवास करतात तेव्हा त्यांना केवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसेस यांचा आधार घ्यावा लागतो आहे का बरे कोकण आणि मुंबई प्रमाणे मराठवाड्यातील चाकरमानी लोकांना रेल्वेने आपल्या घराकडे येणे आणि घराकडून कामाच्या स्थानावर रेल्वेनेच का जाता येऊ नये याचा विचार कोणी आजपर्यंत केला आहे का कोकण आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमानी नोकरदारासाठी ज्या सुविधा रेल्वे खात्याकडून तसेच राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून दिल्या जात असतात त्या सुविधा मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या गोरगरीब प्रवाशांना तसेच शहरी भागांमध्ये आपल्या नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांची सोय का केली गेली नाही माझ्यामते याविषयी साधी चर्चा देखील होत नाही
मराठवाडा हा विकसित भाग आहे असे म्हटले जाते छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपनी उभारल्या गेल्या असल्या तरी अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहत पूर्वीप्रमाणे बेरोजगारांना रोजगार देऊ शकत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाड्याच्या या आठ जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुबलक पाणी आणि रेल्वे मार्ग निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नदी जोड प्रकल्प आणि पावसाळ्यात पश्चिमेकडे नैसर्गिक मार्गाने वाहून जाणारे समुद्रात मिळणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या अनुषंगाने काही घोषणा झालेल्या आहेत परंतु या मोठ्या योजना राबवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक नियोजन करावे लागते तसेच झालेले दिसत नाही जी शक्ती जलयुक्त शिवार या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील प्रकल्पाला दिली गेली आहे तसेच पाठबळ नदीजोड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याला दुष्काळी भागात वळवणे याच्यासाठी देखील दिली गेली पाहिजे अशी मराठवाड्यातील जनतेची अपेक्षा आहे आणि मराठवाड्यातील जनतेची तशी लोकभावना देखील आहे.
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये असणारे आमदार खासदार तसेच राज्यसभा सदस्य विधान परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती मराठवाड्यातील सर्व माजी आमदार सर्व माजी मंत्री सर्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा उच्च पदावर काम केलेल्या लोकप्रतिनिधींनी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नासाठी आणि पाणी प्रश्नासाठी सतत आपला आवाज राजकीय पटलावर उमटवला पाहिजे परंतु केवळ गुत्तेदारी आणि नातेवाईकांना वेगवेगळ्या लाभांचा फायदा करून देण्यासाठी जशी राजकीय इच्छाशक्ती वापरली जाते तशीच इच्छाशक्ती मराठवाड्यामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी आणि रेल्वे मार्गासाठी का वापरली जाऊ नये असा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने मराठवाड्यातील जनतेच्या मनामध्ये येतो आहे आज पर्यंत मराठवाड्यातील जनता देखील विकासाच्या मुद्द्यावर आपला आवाज राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडत आलेला नसल्यामुळे केवळ भावनिक राजकारण केवळ संवेदनशील विषय पुढे करून सहानुभूती मिळवणे तसेच मतदानाचा लाभ मिळवणे असेच सूत्र राजकीय नेत्यांनी उपयोगात आणले आहे यामुळे मूळ विकासाच्या योजना मराठवाड्याला विकसित करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा विशेषतः विज पाणी आणि रेल्वे मार्ग यापासून मराठवाडा वंचित राहिला आहे परिणामी या भागात बाहेरून गुंतवणूक होणे किंवा नवीन उद्योग सुरू होणे ही प्रक्रिया चालली नाही केवळ छत्रपती संभाजीनगर येथे जे उद्योग सुरू आहेत त्याला देखील आज पूर्वीप्रमाणे चांगले दिवस राहिलेले नाहीत व छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे संपूर्ण मराठवाडा आहे का याचा देखील विचार झाला पाहिजे मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जालना नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड आणि छत्रपती संभाजीनगर असे वेगवेगळे आठ जिल्हे आहेत केवळ छत्रपती संभाजी नगर येथे एखादा सांस्कृतिक महोत्सव किंवा एखादी जाहीर सभा घेतली म्हणजे मराठवाड्याचे राजकीय कार्य पूर्ण झाले अशी जी भावना राजकीय पक्षाची झालेली आहे तीच मुळात चुकीची आहे.
मराठवाड्याच्या या भागामध्ये वीज पाणी आणि रेल्वे याची पूर्तता होण्याबरोबर येथील पर्यटन स्थळांचा आणि तीर्थक्षेत्रांचा विकास देखील आजपर्यंत झालेला नाही अलीकडच्या चार-पाच वर्षांमध्ये तीर्थक्षेत्रांचा विकास याची चर्चा होत आहे परंतु त्याला मूळ स्वरूप अद्याप दिले गेलेले नाही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सोलापूर धुळे हा चार पदरी महामार्ग तसेच सोलापूर नागपूर हा चार पदरी मार्ग आणि नव्याने घोषित झालेला सुरत चेन्नई आठ पदरी महामार्ग त्याचबरोबर राज्य सरकारचा महत्वकांक्षी शक्ती पीठ ते भक्ती पेठ हा रस्ते महामार्ग अशा रस्त्यांचा विकास मराठवाड्यात करण्यात आलेला आहे. रस्ते विकासामुळे मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देखील दळणवळण जलद गतीने सुरू झाले आहे या सर्व जलद गतीने सुरू झालेल्या महामार्गांना रेल्वे मार्ग विज पाणी आणि औद्योगिक वसाहती निर्माण होण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधां निर्माण झाल्या तर बाहेरील गुंतवणूकदार उद्योगपती मराठवाड्यामध्ये आपली गुंतवणूक करू शकतात पाण्याचे योग्य नियोजन देखील मराठवाड्यामध्ये केले जात नाही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा त्याचे साठवण करण्याचे प्रकल्प देखील अपुरे आहेत तसेच जे पाणी साठवले जाते त्याचे पुढील वर्षभरामध्ये नियोजन करणे होत नाही मनमानी आणि गाव पातळीवर राजकीय वर्धास्थ असणारी मंडळी रात्रंदिवस 24 तास आपल्या मोटारी या साठवलेल्या पाण्यावर लावतात आणि रात्रंदिवस हे पाणी आपल्या वैयक्तिक शेतीसाठी उपयोगात आणतात.
शेतीसाठी लागणारे पाणी वापरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे किंवा इजराइल धरतीवर मराठवाड्यातील लोकांना विशेषतः शेतकरी बांधवांना पाण्याची नियोजन सांगण्याची नितांत गरज आहे अनेक दुष्काळ अनुभवल्यानंतर देखील मराठवाड्यातील शेतकरी आणि मराठवाड्यातील जनता पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सक्षम झालेले नाहीत किंवा त्यांची मानसिकता देखील तयार झालेली नाही मनमानी तसेच भरमसाठ पाण्याचा वापर करून पाणी फेब्रुवारीपर्यंत संपवणे असा एकलव्य कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने देखील अविकसित असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्याच्या तोंडात कमी पाऊस पडतो तेथे उत्पादित होणाऱ्या उसाचे प्रमाण आणि दर्जा निश्चितच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी आहे परंतु साखर कारखाने मात्र या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहेत या सहकार आणि खाजगी कारखान्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतीवर आणि पाणी पातळीवर किती परिणाम झाला आहे याचा विचार आजपर्यंत झालेला नाही.
केंद्र सरकारकडून सोलापूर तुळजापूर धाराशिव हा 70 किलोमीटरचा रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी मागील वीस वर्षापासून वेळ काढू पण सुरू आहे केवळ घोषणा करून लोकांना जुजबी माहिती दिली जाते आणि त्यानंतर मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होतात हा मागील पंधरा वर्षाचा अनुभव आहे या आठवड्यामध्ये लातूर रोड ते नांदेड या नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे असेच वेगवेगळे रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना जोडून नव्याने निर्माण करावी अशी मराठवाड्यातील जनतेची मोठी मागणी आहे तुळजापूर परळी वैजनाथ छत्रपती संभाजी नगर जालना लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये व्यापारी आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारे मार्ग झाले पाहिजे तसेच या सर्व जिल्ह्यांमधून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या देखील चालवल्या पाहिजेत म्हणजे मराठवाडा रेल्वेच्या नकाशावर देखील आपले अस्तित्व दाखवू शकेल तसेच मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला देखील आपल्या कामासाठी रेल्वे गाडीचा उपयोग करता येईल रेल्वे प्रश्न मराठवाड्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असताना देखील आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे प्रतिनिधित्व करीत आहेत परंतु आमच्या अवलोकनानुसार छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांनाच हे मंत्री महोदय संपूर्ण मराठवाडा समजतात आणि मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नाकडे मात्र त्यांचे सपशेल दुर्लक्ष आहे आपण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधी असताना देखील मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करीत नाहीत याविषयी त्यांना देखील कोणताही संकोच वाटत नाही हे मराठवाड्याच्या जनतेचे दुर्दैव आहे.