व्यंगचित्रकार यांना मोठीं संधी, पुणे संवाद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा – 2024

तुळजापूर दिनांक २४ डॉ सतीश महामुनी

2024पुणे संवाद आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा – 2024

पुणे तिथे काय उणे

पुण्यासंदर्भात ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणण्यात येते.. परंतु या उक्तीचा आजच्या संदर्भात काय अर्थ आहे हा प्रश्न नेहमीच पुढे येतो. आज समाज माध्यमात पुण्याची खिल्ली उडवली जाताना दिसते. आपणांपैकी काहीजणांना हसू येत असेल तर काही सत्य समजून बुचकळ्यात पडत असतील..

आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपले पर्यावरण! ‘पुणे संवाद’ ग्रुपला यासाठी काम करताना नागरी, प्रशासकीय व राजकीय अशा सर्वही स्तरांवर उक्ती व कृती यांमधे विसंगती दिसून येतात. पुणे व परिसर प्रगतीपथावर चालण्यासाठी विकासाचे अनेक प्रयत्न करताना विकास साध्य होण्याऐवजी भकासच साधला जातो आहे हे डोळे उघडे ठेवून बघितले तर सहज दिसून येते.

टेकडी फोडून रस्ते बांधणे, तिच्या पोटातून बोगदे काढणे व त्यासाठी सर्व झाडे तोडणे असे काम प्रस्तावित करण्यात येते. कधी रस्ता रुंदीकरणासाठी आसपासची झाडे काढून पुण्याची प्रगती झाली असे म्हणणे, तर कधी नदीपात्रातील जागेतून मेट्रोचे खांब उभे करणे. ही नवी वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाते परंतु जुन्या वाहतूक व्यवस्थेकडे योग्य दृष्टीने बघितलेच जात नाही.

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी जागोजागी पाण्याचे तुषार उडवणारी स्वच्छता यंत्रणा उभी करणे किंवा खरी झाडे लावणे हे सोडून लोखंडी झाडे उभी केली जातात. नदीतील पाण्याची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक ती संयंत्रे उभारणी करण्याचे काम हातात घ्यायच्या ऐवजी नदीचे काठ बांधून काढण्याची लगबग साधणे व त्यासाठी काठावरील हजारो झाडांची कत्तल करणे व त्या बांधकाम उतारावर गवत लागवड करण्यात येते. आता गवत कुठे व हजारो झाडे कुठे.. काहीतरी जुळवून आणण्याचा खटाटोप करत बसायचा.

प्लास्टिक कचरा जाळण्याची सुविधा निर्माण केली तर जो कचरा जमा होतो, तो कुठे दुसरीकडेच नेऊन टाकायचा व असलेल्या सुविधा खुशाल बंद पडू द्यायच्या !

अहो, नवीन सांगवी- बोपोडी रस्ता तेथील गर्दीचे निवारण करण्यासाठी उभारला तो बोपोडीत जिथे खाली उतरतो तिथे मुख्य रस्त्याला तो ९०° कोनात येऊन मिळतो. सांगवीवरून येणाऱ्याने ब्रेमेन चौकाकडे कसे जायचे? औंध रस्त्यावरून येणाऱ्याने सांगवी पूलावर जाण्यासाठी काय खटाटोप करायचा? आता सांगा कशी काय गर्दी कमी होईल बरे? आणि तिथे अस्तित्वात असलेले दोन पूल तर नियोजन करणाऱ्यांना दिसतच नाहीत की काय हे कळू शकत नाही.

तेव्हा हवा, पाणी, ध्वनी, प्रकाश सर्वही पातळीवर प्रदूषण कमी होण्याऐवजी प्रत्यक्षात ते वाढतंय हे ध्यानात घेतलं जात नाहीये. कसा काय देश नेट कार्बन शून्य दिशेने जाईल बरं?

या व अशा नानाविध विसंगतींवर आधारित पुणे संवाद ग्रुपने कार्टूनिस्ट्स कम्बाईन
च्या सहकार्याने व्यंगचित्र स्पर्धा घेण्याचे नियोजन केले आहे..

‘पुणे संवाद’ ग्रुप हा प्रामुख्याने पुणेकरांच्या तसेच पिंपरी चिंचवडकरांच्या, मनपाशी संबंधित कामांविषयी नागरिकांशी चर्चा करून त्याविषयीच्या अडचणी समजून घेत असतो. मनपाबरोबर या कामाची हाताळणी कशी करावी याबद्दलची व या व्यतिरिक्त मुख्यतः पर्यावरणाविषयी नागरिकांमधे जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतो. वृक्ष, हवा, पाणी, माती, कचरा, वाहतूक, ध्वनी, रस्ते इ. अनेक विषय यामधे अंतर्भूत आहेत..मागील एक वर्षाहून अधिक काळ हा ग्रुप ही कामे करत आहे.
पुण्यामधे हा ग्रुप या कामांसाठी ओळखला जातो..

मित्रहो, उचला तर आपले चित्रसाहित्य व सिद्ध व्हा या विसंगती कागदावर उतरवावयास.
प्रवेशिका कशा पाठवणे, किती तारखेपर्यंत, फी इ. प्रश्न मनात आहेत ना? साधे सरळ उत्तर की ही स्पर्धा खूप अनौपचारिक असून हे प्रश्न दूर सारा.

आपली चित्रे खाली दिलेल्या ईमेल अकौंटवर 2 नोव्हेंबर, शनिवारपर्यंत पाठवणे.
चित्रांचा आकार : A4, 300DPI, JPG
ईमेल लिंक : punesamwad.cc@gmail.com
एक स्पर्धक जास्तीत जास्त 3 व्यंगचित्रे पाठवू शकेल.
व्यंगचित्र ‘नागरी समस्या, पर्यावरण आणि राजकारण’ या विषयावर असणे आवश्यक आहे.
व्यंगचित्र स्वतंत्र आणि नवे (ओरिजिनल) असणे आवश्यक.
नक्कल केलेले किंवा दुसऱ्या चित्राशी बरेच साम्य असलेले चित्र बाद होईल.
कोणत्याही समाज, समुदाय, संस्कृती, धर्म, नागरिकता, शारीरिक व्यंग, यांच्याबाबत अपमानकारक संदर्भ किंवा आशय असे आढळल्यास चित्र स्पर्धेतून बाद होईल.

यावेळी आपण एक आगळावेगळा प्रयोग करणार आहोत. चित्रांची निवड पुणे संवादच्या समितीसह जनताच करणार आहे.

जसजशी चित्रे येतील तसतशी ती पुणे संवाद ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात येतील. ग्रुपचे सभासद त्याबाबत बोलतील, आपली पसंती कळवत राहतील. या पसंतीची नोंद पुणे संवाद ग्रुपच्या संबंधित समितीतर्फे घेण्यात येईल. अंतिमतः समिती परीक्षण पूर्ण करून तीन प्रथम क्रमांकाची चित्रे निवडेल. स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारंभ 9 नोव्हेंबर शनिवार रोजी इंद्रधनुष्य सभागृह, राजेंद्रनगर, दत्तवाडी, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क, पुणे येथे दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान सर्व स्पर्धकांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कृपया सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी ही विनंती. बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक रू 3000/-द्वितीय क्रमांक रू. 2000/- व तृतीय क्रमांक रू. 1000/-.

पुणे संवाद / कार्टूनिस्ट्स कम्बाईन

संपर्क :
१. ९४२२५१३६८५
२. ९३५९६५७०९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *