स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेनेही महत्वपूर्ण पाऊल- आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसील कार्यालयामुळे ग्रामीण जनतेची सोय

ऐतिहासिक नळदुर्गला विकसित पर्यटनस्थळाचे कोंदण, किल्ल्याच्या विकासामुळे अर्थकारणाला गती

तुळजापूर, दि. 13 – प्रतिनिधी
निजाम काळात जिल्हा मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहराला मधल्या काळात बकालपण आले होते. जाणीवपूर्वक नळदुर्ग एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येण्यासाठी प्रयत्न केले. राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेल्या नळदुर्गचा लौकीक आता राज्य नव्हे, तर देश पातळीवर पोहोचला आहे. राज्यातील पहिली बसवसृष्टी, वसंतराव नाईक यांचे स्मारक आणि स्वतंत्र भारतातील पहिले अशोकचक्र विजेते शहिद बचित्तरसिंह यांचे भव्य स्मारक, अशा वेगवेगळ्या प्रकल्पातून येणाऱ्या काळात एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून नळदुर्गचा लौकिक ठळकपणे राज्याच्या नकाशावर कोरला जाईल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

पर्यटन क्षेत्र म्हणून तुळजापूर आणि नळदुर्ग ही ऐतिहासिक शहरे विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक होते. त्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न केले. राज्यातील पहिली भव्य बसवसृष्टी नळदुर्ग येथे साकारणार आहे. त्यासाठी सोलापूर-हैद्राबाद-राष्ट्रीय महामार्गालगत पाच एकर जागा उपलब्ध करून घेतली आहे. त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, साऊंड अ‍ॅन्ड लाईट शो, तसेच प्रशस्त ध्यानकेंद्रासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांचेही भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. त्यासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निजामाच्या जोखडातून आणि रझाकारांच्या अमानवी छळातून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी मोठे शौर्य गाजवून हौतात्म्य पत्करलेले हवालदार बचित्तरसिंह यांचेही स्मारक 75 वर्षानंतर नळदुर्गच्या शौर्यभूमित उभारले जात आहे. त्या ठिकाणी ज्ञात-अज्ञात हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिंनाही उजाळा मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

ऐतिहासिक नळुदर्गच्या पुढील 30 वर्षांची गरज लक्षात घेवून 48 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. तर शहरातील डीपी रस्ते, नाली व इतर विकासकामांसाठी 150 कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. स्वतंत्र तालुका निर्मितीची 50 वर्षांपासूनच्या मागणीला आपण आकार दिला आहे. नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालय कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे तालुका निर्मितीचा एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. मुस्लिम समाजबांधवांसाठी 2 कोटी रूपयांच्या निधीतून शादीखाना उभारणीचे काम सुरू आहे. तर राष्ट्रीय महामार्गालगत ट्रामाकेअर सेंटरला मंजुरी मिळाल्याने भीषण अपघातातील व्यक्तींना वेळेत उपचार मिळून जीवितहानी टळण्यास मदत होणार आहे. 55 वर्षांपासून दुरूस्तीअभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी 29 कोटी रूपयांचा निधी उपलबध झाला आहे. कामाची निविदाही जाहीर झाली असून त्यामुळे 10 गावांतील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नळदुर्ग, होर्टी येथे एमआयडीसी उभारून त्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरूणांच्या हाताला हक्काचा रोजगार देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नळदुर्ग येथे कृषी उत्पन्न बाजार समिती होण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. पुढील कार्यवाही देखील लवकरच होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नळदुर्गमध्ये जाहीर सभा
तुळजापूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची गुरूवार, 14 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *