” उसवण ” मधून शिलाई कामगाराच्या जीवनाचा संघर्ष मांडला – देविदास सौदागर
कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद करावा लागला
तुळजापूर दिनांक 15 डॉक्टर सतीश महामुनी
प्रचंड वाचन, प्रतिकूल परिस्थितीचे विवेचन, कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम, अशा विविध अंगांनी परिस्थितीशी झुंज देणाऱ्या लेखकाची कहाणी कादंबरीच्या निमित्ताने समोर आली आहे. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपासमार होते बारा बलुतेदार आणि वेगवेगळ्या मूलमजुरी करणाऱ्या कारागिराची हाल अपेक्षा पाहिली जात नाही अशा दारिद्र्याचे लेखन युवा लेखक देविदास सौदागर यांनी अत्यंत वास्तव ओपन कली आहे. वास्तवाची ओळख करून देणारे ही कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कारीत केली. तुळजापूरच्या मातीसाठी हा सुवर्णक्षण आहे.
शिलाई कामगार आणि शिलाई व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची व्यथा आणि संघर्ष आपण उसवण या कादंबरीमध्ये मांडले आहे, अखिल भारतीय साहित्यअकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन पिढ्यांचा संघर्ष आणि लॉकडाऊन नंतर निर्माण झालेली परिस्थिती याची नोंद घेतली गेल्याची समाधान आहे अशी प्रतिक्रिया देविदास सौदागर यांनी दिली आहे.
अखिल भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार
मिळाल्याबद्दल मनापासून आनंद झाला आहे. जगण्याचा संघर्ष आणि रेडिमेड कपड्याच्या दुनियेमध्ये शिलाई काम करणाऱ्या कामगारांच झालेली होरपळ, या कामगारावर आलेले आर्थिक संकट त्यामधून निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न याला आपण या कादंबरी मधून वाचा फोडली आहे. ही कादंबरी परंपरागत केला जाणारा शिलाई व्यवसाय आज कोणत्या स्थितीमध्ये आहे. याचे दर्शन घडविते. परंपरागत शिलाई काम करून ग्रामीण भाग आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अलीकडच्या काळात रेडीमेड कपडे उपयोगात आणणे तसेच रेडिमेड कपड्याची मोठी बाजारपेठ उभी राहिल्यामुळे कपडे शिलाई करण्याचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. कोरोना संकट आले या काळात तर दुकानाचे भाडे भरणे देखील कठीण झाल्यामुळे तुळजापूर शहरांमधील मंगळवार पेठ येथे भांगे यांच्या जागेमध्ये सौदागर टेलर्स नावाचा आमचा व्यवसाय आम्हाला बंद करावा लागला.
वडील तुळजापूर येथील महात्मा फुले रात्र शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरीस आहेत. ते देखील शिलाई काम व्यवसाय करत मोठे झाले आहेत यापूर्वी त्यांनी मोगरकर व सत्यम टेलर यांच्या दुकानांमध्ये शिलाई कामगार म्हणून 35 वर्ष काम केले आहे. या पुस्तकाचे लेखक देखील अनेक वर्ष शिलाई काम करीत होते कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये दुकान बंद झाल्यानंतर त्यांनी शिवणकाम देखील बंद केले. शालेय जीवनापासून कथा कादंबरी वाचनाचे आवड असणारे देविदास सौदागर यांचा तुळजापूर येथे जन्म झाला. पहिली ते सातवी पर्यंत रामवर्धिनी प्रशाला येथे प्राथमिक शिक्षण व कुलस्वामिनी विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण घेतले. अकरावी बारावीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे घेतले परंतु 2009 मध्ये बारावी वाणिज्य शाखेतून अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बहिस्थ टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांमधून पदवी संपादन केली. आणि इतिहास विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी टिळक विद्यापीठामधून संपादन केली. त्यानंतर 2023 मध्ये ते अंबु माता कनिष्ठ महाविद्यालय सलगरा दिवटी येथून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाले.
लातूर जिल्ह्यातील भातागळी येथील वर्षा यांच्याशी देविदास यांचा विवाह झाला त्यांना सिंधू ही मुलगी व शंभू हा मुलगा असे दोन अपत्य आहेत दोन बहिणी असून दीपा अमोल रुमणे ही लातूरमध्ये स्थित आहे. दुसरी बहीण पूजा ही तुळजापूर येथे राहते. अंबादास हे त्यांचे छोटे बंधू आहेत. बालिका बाई सौदागर या मातोश्री असून त्या गृहिणी आहेत. तुळजापूर येथील कोंडो प्लॉटिंग मध्ये देविदास सौदागर यांचे निवासस्थान आहे. सर्वसाधारणपणे मोलमजुरी करणे किंवा कामगार म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील हा जाज्वल्य संघर्ष आहे वाढती महागाई त्याचबरोबर बेरोजगारी या अनुषंगाने देविदास सौदागर यांनी आपल्या भावना व्यक्त करून शासन दरबारी जेवढी नोकरीची पदे रिक्त आहेत त्या सर्व पदावर शासनाने तरुणांची नियुक्ती केली पाहिजे त्याशिवाय बेरोजगारी कमी होणार नाही. सर्वसाधारणपणे देशांमध्ये 40 लाख वेगवेगळी नोकरीची पदे रिक्त आहेत यासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्याशिवाय मध्यमवर्गीयाची आर्थिक दरी दूर होणार नाही अशी भावना व्यक्त केली आहे.
मुलाला पुरस्कार मिळाल्याचे समजल्यानंतर आई बालिकाबाई सौदागर आणि वडील महादेव सौदागर यांना खूप आनंद झाला मुलाच्या कष्टाचे फळ मिळाले त्याने जो संघर्ष पाहिला त्यामधून त्यांनीही कादंबरी लिहिली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बहिण दीपा हिनेदेखील माझा भाऊ खूप कष्टाने कुटुंबाला पुढे घेऊन जातो आहे त्याच्या लेखनाला मिळालेले यश हे आमच्यासाठी खूप मोठे आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तुळजापूर येथील विजय वाचनालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके देविदास सौदागर यांनी वाचली आणि त्यांच्या मनावर प्रभाव पडला वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके आपण वाचत गेलो आणि ज्ञानग्रहण करत गेलो चित्र आणि फकीरा या कादंबरीने मनावर परिणाम केला असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
2018 मध्ये कवितासंग्रह कर्णाच्या मनातलं.. 2021 मध्ये कवितासंग्रह काळजात लेणं कोरताना…. 2022 मध्ये कादंबरी उसवण अशी पुस्तके देविदास सौदागर यांनी लिहिली आहेत ही कादंबरी देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले असून हा पुरस्कार मिळाल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे कवी देविदास पाटील व कवी विजय देशमुख यांनी देविदास सौदागर यांच्या या कादंबरीला पुरस्कार मिळणे हा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या साहित्याचा गौरव आहे असे सांगितले.
पुरस्कार जाहिरात आल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूरच्या वतीने देविदास पाटील, विजय देशमुख किरण हंगरगेकर, प्रशांत भोसले, जीवन राजे इंगळे, संदीप गंगणे महेश गवळी, अनिल लागलावे, गोविंद खुरुद ,सतीश महामुनी, विवेक कोरे, कुलकर्णी, ग्रंथपाल जोशी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्राप्त साहित्यिक देविदास सौदागर याचा साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना देविदास सौदागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दीड वर्षांपूर्वी माझ्या मुलासाठी राज्य शासनाचे किशोर हे मासिक आपण सुरू केले. शून्य वयापासूनच मी माझ्या मुलाला किशोर हे मासिक वाचण्यासाठी प्रवृत्त केले त्याने पहिले तीन महिने केवळ पुस्तक फाडण्याचे काम केले कारण त्याला काहीही समजत नव्हते कालांतराने त्याला किशोर मासिकाची आवड लागली आज तो दीड वर्षाचा आहे. तो आता त्या मासिकातील चित्र रंगवतो आणि अक्षर ओळख देखील करतो आहे ही साहित्याची गोडी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची मानसिकता समाजाने देखील अंगीकारावी, मोबाईलचा वापर अत्यंत कमी केल्याशिवाय साहित्याची गोडी लागणार नाही आणि साहित्याची गोडी लागल्याशिवाय वाचन संस्कृती वाढणार नाही असे मनोगत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्य देविदास सौदागर यांनी तुळजापूर येथे सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले.